पुण्यातील महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेतील मोठा तुटवडा माहिती अधिकारातून पुन्हा उजेडात आला आहे. महापालिकेच्या अखत्यारितील एकूण ३१३ शाळांमध्ये तब्बल ३२० शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने भरल्या असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिले.

आपचे शहर उपाध्यक्ष अॅड. कृणाल घारे यांच्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात, महापालिकेच्या प्रशासन अधिकारी व जनमाहिती अधिकारी खेहल उकरंडे यांनी दिलेला तपशील असा— मराठी माध्यम २३४, इंग्रजी माध्यम ४६, उर्दू माध्यम ३९ आणि कन्नड माध्यम २ अशा एकूण ३१३ शाळांमध्ये खालीलप्रमाणे मंजूर पदसंख्या आहे:
- मुख्याध्यापक : २३३
- उपशिक्षक : १,७९०
- पदवीधर शिक्षक : ८१९
यापैकी ५७ मुख्याध्यापक, २४ उपशिक्षक आणि २३९ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अन्य शिक्षक कार्यरत असले तरी अनेक माध्यमांच्या शाळांत अतिरिक्त व तुटवडा दोन्ही स्थिती दिसते.
या पार्श्वभूमीवर अॅड. घारे आणि आप शिक्षक आघाडीच्या शीतल कांडलकर यांनी टीका करताना म्हटले की, सरकार डिजिटल शिक्षण, दर्जेदार शाळांचे दावे करत असले तरी जमिनीवरील शिक्षण व्यवस्थेची अवस्था अत्यंत गंभीर आहे. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षकच उपलब्ध नाहीत. ही बेपर्वाई समाजाच्या भविष्यावर परिणाम करणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वाढती बालगुन्हेगारी ही शिक्षणातील ढासळलेल्या व्यवस्थेशी संबंधित असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. महापालिकेने तातडीने पूर्णवेळ शिक्षक भरती करावी आणि यासाठी आप पक्ष उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी सांगितले की, रिक्त पदांवर करार पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून नियमित भरतीसाठी बिंदुनामावलीची प्रक्रिया देखील सुरू आहे.

Comments are closed.