शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या तीव्र तुटवड्यामुळे शिक्षणाची अवस्था ढासळली असून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. तालुक्यात उपशिक्षकांच्या ८३, पदवीधर शिक्षकांच्या ५८ आणि मुख्याध्यापकांच्या ७ अशा एकूण १४८ पदे रिक्त आहेत. या मोठ्या रिक्ततेमुळे अनेक शाळांमध्ये शिकवणी जवळपास ठप्प झाली आहे.

परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की रांजणगाव सांडस येथील कामाठेवाडी शाळा आणि निर्वी येथील सोनवणेवस्ती शाळा येथे एकही शिक्षक नाही, त्यामुळे येथे वर्ग फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत. अलीकडील बदली प्रक्रियेत जास्त विद्यार्थ्यांच्या शाळांतून कमी विद्यार्थ्यांच्या शाळांकडे शिक्षकांचे हालचाल झाल्याने काही शाळा शिक्षकविहीन तर काहींचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
यामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही, विद्यार्थ्यांची मूलभूत कौशल्ये विकसित होत नाहीत आणि शैक्षणिक नुकसान प्रचंड वाढत आहे. काही ठिकाणी पालकांना स्वतः मुलांचे अभ्यास बघावे लागत असून काही विद्यार्थी शाळेत जाणेही बंद झाले आहे.
रिक्त पदे तातडीने भरणे, शाळानिहाय गरजेनुसार बदली प्रक्रिया आखणे आणि शिक्षकविहीन शाळांना तत्काळ शिक्षक पुरवणे या मागण्यांनी ग्रामस्थ, पालक आणि लोकप्रतिनिधी शासनापुढे जोर धरला आहे. ग्रामीण शिक्षणव्यवस्थेचा पाया डळमळीत होत असताना प्रशासनाने तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक झाले आहे.

Comments are closed.