गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या असूनही २१% शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे ७८३ शिक्षक व मुख्याध्यापकांची कमतरता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. पालक व ग्रामस्थांनी रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी केली आहे.
काही ठिकाणी कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात आली असली तरी अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीत. विशेषतः नक्षलग्रस्त भागातील मालेकसा, देवरी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यांमध्ये शिक्षक जायला तयार नाहीत, त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
शिक्षक टंचाईव्यतिरिक्त, जिल्हा परिषद शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा अभाव दिसून येतो. अनेक शाळांची इमारत जीर्ण अवस्थेत असून, सुरक्षा भिंत, वीज, शौचालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधाही अपुऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
गोंदिया जिल्ह्यात १९० पदवीधर शिक्षक आणि ५५० सहाय्यक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रिक्त पदे त्वरित भरली नाहीत तर जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता अधिकच घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.