जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागात तब्बल ८५ शिक्षकांची पदं रिक्त आहेत. सध्या या रिक्त जागांचा तात्पुरता कारभार पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षकांकडे सोपवण्यात आलाय.
ही पदं भरली नाहीत तर नुकत्याच आलेल्या पूर्णवेळ गटशिक्षणाधिकाऱ्यांवर प्रशासन आणि शिक्षण या दोन्ही आघाड्यांवर ताण वाढणार हे नक्की.
तालुक्यात १६,३१८ विद्यार्थ्यांसाठी ९६५ शिक्षक कार्यरत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना या रिक्त पदांमुळे अर्धवट राहतात. त्यामुळे विविध शिक्षक संघटनांकडून तत्काळ भरतीची मागणी केली जात आहे.
तालुक्यात २५ केंद्रप्रमुख पदं रिक्त असून त्यांचं तात्पुरतं काम पदवीधर किंवा उपशिक्षकांकडे आहे. त्यामुळे अध्यापनाकडे लक्ष कमी जाऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय.
६ शिक्षण विस्तार अधिकारी पदं रिक्त आहेत आणि उरलेल्या चार अधिकाऱ्यांकडे दहा बीटांचं काम सोपवण्यात आलं आहे. शिक्षक संघटनांनी शासनाकडे मागणी केली आहे की ५०% पदं पदोन्नतीने व उरलेली ५०% सरळसेवेने तात्काळ भरावीत. यासाठी परीक्षा घ्यावी, अशी लेखी मागणी देखील करण्यात आली आहे.
शासन सध्या बदल्या करण्यात व्यस्त असताना अनेक तालुक्यांत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची पदं रिक्त आहेत. जर ही पदं आधी भरली असती तर शिक्षकांना पदोन्नतीसाठी संधी मिळाली असती आणि बदल्यांसाठीही अधिक शिक्षक पात्र ठरले असते.
जुन्नर तालुक्यातील शिक्षणविषयक आकडेवारी:
एकूण शाळा: ३५०
एकूण केंद्र: ३२
एकूण शिक्षक: ९६५
रिक्त पदांचा तपशील:
गटशिक्षणाधिकारी – मंजूर: १ | कार्यरत: १ | रिक्त: ०
शिक्षण विस्तार अधिकारी – १० | ४ | ६
केंद्रप्रमुख – ३२ | ७ | २५
मुख्याध्यापक – २९ | १४ | १५
पदवीधर शिक्षक – १२३ | ११९ | ४
उपशिक्षक – ८५० | ८१५ | ३५
वरिष्ठ सहाय्यक – २ | २ | ०
कनिष्ठ सहाय्यक – २ | २ | ०
परिचर – १ | १ | ०
एकूण – १०५० | ९६५ | ८५

Comments are closed.