राज्यात बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मोठा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाची राज्यव्यापी चौकशी विशेष चौकशी पथक (SIT) मार्फत सुरू करण्यात आली आहे. २०१२ पासून आजपर्यंत मंजूर झालेल्या सर्व शालार्थ आयडी प्रकरणांची सखोल तपासणी केली जाणार असून, गरज भासल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागात ४,०७५ शालार्थ आयडी प्रकरणे तपासणीसाठी संकलित करण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयांकडून शालार्थ आयडीच्या संचिकांचा शोध, पडताळणी आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने ही कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे.
राज्यात नागपूरसह अनेक ठिकाणी अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे नियमबाह्य पद्धतीने शालार्थ प्रणालीत समाविष्ट करून वेतन अदा केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. या गंभीर तक्रारींची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना केली. या पथकात पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारुण आतार यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
SITकडून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य तसेच विना-अनुदानितवरून अनुदानित पदांवरील बदली यांची सखोल तपासणी केली जात आहे. २०१२ पासूनची सर्व प्रकरणे तपासण्याचे स्पष्ट निर्देश पथकाला देण्यात आले आहेत.
कागदपत्रांचे स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन
शिक्षणाधिकारी कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मंजूर शालार्थ आयडी संचिकांची पडताळणी सुरू केली असून, या संचिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक कागदपत्राचे स्कॅनिंग केले जात आहे. यासोबतच वैयक्तिक मान्यता प्रकरणांचे अनुदान टप्प्यानुसार, वर्षनिहाय आणि जिल्हानिहाय वर्गीकरणही केले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागात २०१९ पासून उच्च माध्यमिक स्तरावर ४,०७५ शालार्थ आयडी मंजूर झाले असून, सध्या त्या सर्व संचिका संकलित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच SITकडून प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
गरज भासल्यास नोटिसा
राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड, लातूरसह विविध जिल्ह्यांत बोगस नियुक्त्यांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, संचिका गहाळ आढळल्यास त्या काळात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या जातील, असे अधिकारीसूत्रांनी स्पष्ट केले आहे.
एकूणच, शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली असून, शालार्थ आयडीच्या माध्यमातून झालेल्या सर्व संशयास्पद नियुक्त्यांचा हिशोब लावला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Comments are closed.