राज्यातील शिक्षक पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राबवली जाणार आहे. आतापर्यंत शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणाखाली पवित्र पोर्टलद्वारे ही भरती केली जात होती.
मात्र सरकारने सुकाणू समितीची स्थापना करत शिक्षक भरतीचे सर्व कामकाज परीक्षा परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, शिक्षक पदभरती ही सातत्याने चालणारी आणि वेळखाऊ प्रक्रिया असल्याने शिक्षण आयुक्त कार्यालयाचा मोठा वेळ यामध्ये खर्च होत होता. त्यामुळे इतर महत्त्वाच्या शैक्षणिक धोरणे आणि निर्णयांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. परीक्षा आयोजन आणि निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असावी, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात शिक्षक भरतीसाठी परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते. मात्र २०१८ आणि २०१९-२० मधील TET परीक्षांमध्ये झालेल्या अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणांमुळे हा निर्णय योग्य की अयोग्य, यावर पात्रताधारकांमध्ये तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. त्या गैरप्रकारांनंतर संबंधितांवर कारवाईही करण्यात आली होती.

Comments are closed.