राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान निर्माण झालेल्या संभ्रमावर अखेर पडदा टाकण्यात आला आहे. प्राधान्यक्रम निवड, निवडीनंतर पुन्हा अर्ज करताना परीक्षा द्यावी लागेल का, वयोमर्यादा कोणत्या दिनांकानुसार ग्राह्य धरली जाईल, तसेच इंग्रजी माध्यमातील शिक्षक पात्रतेबाबत असलेला गोंधळ शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी सुधारित शासन निर्णयाद्वारे दूर केला आहे.

नव्या निर्णयानुसार, शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना जाहिरातीत उपलब्ध सर्व प्राधान्यक्रम उमेदवारांना दिसतील; मात्र त्यापैकी कमाल ५० प्राधान्यक्रम देणेच शक्य राहणार आहे. ही मर्यादा मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय होणाऱ्या भरतीसाठी स्वतंत्रपणे लागू होणार आहे. उमेदवार जर निवडीनंतर त्याच गटासाठी पुन्हा अर्ज करत असेल, तर त्याला अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पुन्हा देणे बंधनकारक राहणार आहे. मात्र, उच्च गटासाठी अर्ज केल्यास पूर्वी मिळविलेले गुण ग्राह्य राहतील.
वयोमर्यादा जाहिरातीत नमूद केलेल्या दिनांकानुसार ग्राह्य धरली जाईल. तसेच २०२२ मध्ये कोरोना काळात घेतलेल्या दोन वर्षांच्या वयोमर्यादेची सवलतही कायम राहणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी डीएड किंवा बीएड पूर्ण केलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जातील. मात्र अनुसूचित जाती/जमाती किंवा इतर सामाजिक प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास, इंग्रजी विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल.
शिक्षक भरती प्रक्रियेतील सुधारित नियमांमुळे प्रणालीवरील ताण कमी होईल, भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल आणि वेळेत शिक्षक उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रिया राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी दिली आहे.

Comments are closed.