शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात संस्थांना पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बऱ्याच संस्थांची बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे शिक्षक भरतीच्या जागांबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.
राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत जानेवारीपासून तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील रिक्त पदांसाठी जाहिराती निघाव्यात यासाठी व्यवस्थापनांना वारंवार संधी दिली जात आहे. मात्र, अद्यापही फक्त १९०० संस्थांनीच जाहिरात प्रसिद्ध केल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) पात्र उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र प्रक्रिया सुरू आहे. ११ मार्चपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेस २० मार्च ही अंतिम मुदत आहे. मात्र, रिक्त पदांची स्पष्टता नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मागासवर्गीय कक्षात प्रस्ताव रखडले!
शिक्षक भरतीसाठी बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक संस्थांचे प्रस्ताव रखडल्याने भरती प्रक्रियेला विलंब होत आहे. मराठवाडा आणि इतर भागांमध्येही हीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येते.
सरकारी शाळांच्या भरती प्रक्रियेतही विलंब
सुमारे १९०० संस्थांनीच शिक्षक भरतीसाठी जाहिरात दिली असून, सरकारी शाळांची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे राज्यात किती जागांसाठी भरती होईल हे स्पष्ट नाही. भरती प्रक्रियेच्या संथ गतीमुळे उमेदवारांमध्ये नाराजी आणि संताप वाढत आहे.