Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University येथे शिक्षक प्रवर्गातील भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असून, ७३ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता २० मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने शैक्षणिक पात्रता, अध्यापन व संशोधन कार्याशी संबंधित एटीआर (Academic Teaching & Research) माहिती भरावी लागणार आहे. तसेच नव्या उमेदवारांनाही या संधीचा लाभ घेत अर्ज करता येणार आहे.

विद्यापीठातील विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. राज्य सरकारने सार्वजनिक विद्यापीठांमधील शिक्षक भरती प्रक्रियेबाबत ११ फेब्रुवारी रोजी सुधारित कार्यपद्धती जाहीर केली होती. या नव्या पद्धतीनुसार उमेदवारांची निवड ६०:२०:२० या गुणोत्तरानुसार केली जाणार आहे. यात अकॅडमिक रेकॉर्ड ६० टक्के, अध्यापन कौशल्ये २० टक्के आणि मुलाखत २० टक्के असे मूल्यांकन केले जाणार आहे.
या भरतीमध्ये मुख्य कॅम्पससह धाराशिव उपकेंद्रातील एकूण ७३ पदांचा समावेश आहे. त्यामध्ये ८ प्राध्यापक, १२ सहयोगी प्राध्यापक आणि ५३ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया केंद्र शासनाच्या SAMARTH Portal या ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवली जात आहे. आतापर्यंत विविध पदांसाठी ६९१४ अर्ज प्राप्त झाले असून, मुदतवाढ मिळाल्याने पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जाहीर करत २० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील, असे स्पष्ट केले आहे. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना अर्जाच्या दोन हार्ड कॉपी २५ मार्चपर्यंत आस्थापना विभागात जमा करणे आवश्यक आहे. शिक्षक भरतीसाठी विद्यापीठाने मार्च–एप्रिल २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू केली असून, विविध टप्प्यांमध्ये अर्ज भरणे, दुरुस्ती आणि अद्ययावत माहिती भरण्याची संधी देण्यात आली आहे. आता नव्या मुदतवाढीमुळे इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे.

Comments are closed.