राज्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांची स्थिती चिंताजनक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, अमरावती विभागाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून, सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील रिक्त प्राध्यापक पदांची तातडीने भरती करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या माहितीनुसार, राज्यात सध्या १२,२५३ हून अधिक प्राध्यापक पदे रिक्त आहेत. अकृषी विद्यापीठांमध्ये जवळपास अर्धी पदे रिक्त आहेत तर अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ११ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत.
२०१७ पासून या भरतीत विलंब झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी रचना (NIRF) २०२५ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ९१ वे व मुंबई विद्यापीठाला ९२ वे स्थान मिळाले असून, राज्यातील इतर आठ विद्यापीठांचे दर्जा घसरला आहे.
स्थायी प्राध्यापकांच्या अभावामुळे शिक्षण व संशोधनाची गुणवत्ता घटली आहे. निवेदनात म्हटले आहे की, ही स्थिती पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. सध्या विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये २२ हजार कंत्राटी व तासिक प्राध्यापक कार्यरत आहेत, ज्यांना फक्त अकरा महिन्यांसाठी नियुक्त केले जाते आणि ३० ते ४० हजार रुपये इतके मर्यादित वेतन मिळते.
समान कामासाठी समान वेतन हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश असूनही शासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत, अशी खंत संघटनेने व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के पदभरतीची घोषणा केली होती, जी स्वागतार्ह आहे. संघटनेचे सहसचिव डॉ. कल्याण साखरकर यांनी मागणी केली आहे की, राज्य सरकार पुढील दोन आठवड्यांत शासन निर्णय काढून भरती प्रक्रिया तत्परतेने सुरू करावी.

Comments are closed.