टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक पदोन्नतीच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्र प्रमुख पदाची पदोन्नती केली जाणार असून, त्यानंतर संच मान्यता अंतिम होताच उपाध्यापक, मुख्याध्यापक आदी पदांवरील पदोन्नतीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. या प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ नये आणि सर्व पदोन्नत्या शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, अशी ठाम मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नोकरी टिकवण्यासाठी आणि पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आल्याने मागील काही काळात पदोन्नती प्रक्रिया थांबली होती. मात्र शिक्षक संघटनांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, अटी व शर्तींच्या अधीन राहून पदोन्नतीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंदाजे मुख्याध्यापकांची 100, विस्तार अधिकाऱ्यांची 50 आणि केंद्र प्रमुखांची 60 पेक्षा अधिक पदे पदोन्नतीद्वारे भरली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अवर सचिव शरद माकणे यांनी काढलेल्या पत्रानुसार न्यायनिर्णयानंतर दोन वर्षांची कोणतीही सवलत नसून, टीईटी उत्तीर्ण शिक्षकच पदोन्नतीस पात्र ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अंतिम संच मान्यता झाल्यानंतरच मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या होतील; मात्र पटसंख्या घटल्याने या पदांची संख्या कमी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी पदांसाठी मात्र संच मान्यतेची अडचण नसली, तरी टीईटीची पहिली परीक्षा पुरेशी आहे की दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

Comments are closed.