राज्यात तलाठ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे गावपातळीवरील प्रशासन ठप्प झाल्याचे चित्र आहे. सध्या महसूल विभागात २४७१ तलाठी पदे रिक्त असून, त्यामुळे एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. याचा थेट परिणाम शेतकरी आणि नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने २०२५ मध्ये सुमारे १७०० तलाठी पदांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अनेक वर्षांपासून ही भरती रखडलेली असल्याने, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून ती तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत होती.
महसूल विभाग हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, याच विभागातून शासनाला सर्वाधिक उत्पन्न मिळते. मात्र सुमारे ३ हजार पदे रिक्त असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे. तलाठ्यांच्या कमतरतेमुळे सातबारा उतारे, शेतसारा वसुली, गारपीट पंचनामे, निवडणूकविषयक कामे तसेच विविध शासकीय योजना वेळेत राबवण्यात अडथळे येत आहेत.
गावपातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तलाठ्यांवरील कामाचा ताण लक्षात घेता, ही भरती प्रक्रिया लवकर सुरू होणे आवश्यक आहे. सरकारने या दिशेने पावले उचलल्याने तलाठी भरती २०२५ लवकरच सुरू होईल आणि त्यामुळे गावकारभाराला अपेक्षित गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.