जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालय, समर्थ महाविद्यालय तसेच ताजनापूर शांताराई महाविद्यालय आणि फुलंब्री तालुक्यातील शेलगाव येथील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट दिली. त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन व्यवस्थेची तपासणी केली आणि परीक्षेतील शिस्तबद्धतेचा आढावा घेतला.
परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश सीईओ मीना यांनी केंद्रप्रमुखांना दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला कॉपीच्या सवयीमुळे मोठा फटका बसतो, त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा कठोर उपाययोजना केल्या आहेत.
येत्या काळात वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेट देतील. परीक्षेच्या व्यवस्थेत अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सीईओ मीना यांनी स्पष्ट केले.
राज्यात दहावी व बारावी परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावीपणे कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. परीक्षेच्या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी भरारी पथके तसेच बैठे पथके तैनात करण्यात आली आहेत.