सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) विविध पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ८ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती मोहिमेद्वारे एकूण २२ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये सहायक संपादक (SC Reports) – ५ जागा, सहायक संचालक (SC Museum) – १ जागा, वरिष्ठ न्यायालय सहायक (Museum) – २ जागा आणि सहायक ग्रंथपाल – १४ जागांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होणार आहे: लेखी परीक्षा, संगणक पात्रता चाचणी आणि त्यानंतर मुलाखत.
शैक्षणिक पात्रतेनुसार, सहायक संपादक पदासाठी कायद्याची पदवी आणि किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. सहायक संचालक पदासाठी संग्रहालयशास्त्रात प्रथम श्रेणीतील पदव्युत्तर पदवी व ५ वर्षांचा संशोधन अनुभव अपेक्षित आहे. वरिष्ठ न्यायालय सहायक पदासाठी संग्रहालयशास्त्रात किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर सहायक ग्रंथपाल पदासाठी ग्रंथालय विज्ञानातील पदवी, संगणक डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील ‘Recruitment’ लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी करावी, अर्जातील सर्व माहिती अचूक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. सरकारी क्षेत्रात प्रतिष्ठित पद मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याने पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.

Comments are closed.