परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न आर्थिक अडचणी किंवा कठीण प्रवेश परीक्षांमुळे मागे पडत असेल, तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. रशियन सरकारने २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा न देता उच्च शिक्षण घेण्याची संधी देणारी शासकीय शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
या योजनेअंतर्गत रशियातील विविध शहरांमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळणार असून, अनेक अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून उपलब्ध असतील. मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, कझान, व्लादिवोस्तोक यांसारख्या शहरांतील महाविद्यालयांचा यात समावेश आहे; मात्र लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी आणि MGIMO या योजनेत नाहीत. अर्जासाठी विद्यार्थ्यांना education-in-russia.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
सध्या रशियात २७ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून, ही शिष्यवृत्ती पदवी, पदव्युत्तर, एमफिल, स्पेशालिस्ट डिग्री तसेच प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, गणित, मानव्यशास्त्र, कृषी, अवकाश विज्ञान, क्रीडा आणि कला अशा अनेक क्षेत्रांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीयसह अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने सुरुवातीला रशियन भाषा येणे आवश्यक नाही. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा रशियन भाषा तयारी अभ्यासक्रमही उपलब्ध आहे.
या शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही प्रवेश परीक्षा नाही. विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या शैक्षणिक कामगिरी व पोर्टफोलिओवर होईल. संशोधन लेख, शिफारसपत्रे, स्पर्धा किंवा ऑलिम्पियाड प्रमाणपत्रांचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करता येईल. विद्यार्थ्यांना सहा विद्यापीठांपर्यंत पर्याय निवडण्याची मुभा आहे.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात कागदपत्र पडताळणी (अंतिम तारीख १५ जानेवारी) केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात रशियन शिक्षण मंत्रालयाकडून प्रवेश व व्हिसासंबंधी अंतिम कागदपत्रे दिली जातील. कमी खर्चात, परीक्षा न देता परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Comments are closed.