महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी MSRTC बससेवावर होणाऱ्या समस्यांवर त्वरित उपाय म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरला आहे. काही दिवसांत या हेल्पलाईनवर तब्बल ३०८ तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत, ज्यातून विद्यार्थी बस सेवेत येणाऱ्या प्रमुख अडचणींचा थेट मंत्र्यांच्या निदर्शनाला आला.

नोंदवलेल्या तक्रारींमध्ये मुख्यतः वेळेवर बस न येणे, बस थांब्यावर न थांबणे, पासधारकांना प्रवेश नाकारणे अशा गंभीर समस्यांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. नियोजित थांब्यांवर बस न थांबणे, लांब पल्ल्याच्या बसमध्ये पासधारक विद्यार्थ्यांना प्रवास न देणे अशा प्रकरणांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी त्वरित हेल्पलाइन सुरू करून समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आणि संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांवर निलंबनासह कठोर सूचना दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत.
मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, फक्त तक्रारी नोंदवणे नाही तर १००% निराकरण सुनिश्चित करावे. त्यामुळे हा हेल्पलाईन फक्त “तक्रार पेटी” राहणार नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाचे विश्वास केंद्र बनेल.

Comments are closed.