महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांवर कडक नजर ठेवण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानासाठी २५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत.

जिल्ह्यात बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार असून, ५२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार असून, ७५ केंद्रांवर तब्बल ३७ हजार ५७९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
कॉपीमुक्त अभियानांतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर एकूण २५ भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची झडती घेतली जाणार असून, प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे थेट नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून ठेवण्यात येणार आहे.
कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास भरारी पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचून कठोर कारवाई करणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याने, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.

Comments are closed.