पुण्यात आता शिक्षण संस्थांमध्ये पोलिसांचे लक्ष अधिक केंद्रित होणार असून विद्यार्थ्यांची शिस्त पुन्हा नीट बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाने वर्षभराचा खास आराखडा तयार केला आहे. विद्यार्थी वाहतूक नियमांचा सर्रास भंग करत आहेत, मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रकार वाढत आहेत, शिवाय अमली पदार्थांचा वापरही चिंताजनकरीत्या वाढताना दिसतोय. यात पालकांनीही लक्ष घालणं अत्यावश्यक असल्याचं पोलिसांचं मत आहे.

‘शिक्षणात सुरक्षित क्षितिजे’ या विषयावर पुणे शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या परिसंवादात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सिंबायोसिस संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, वरिष्ठ विधिज्ञ एस.के. जैन, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शहरातील नामांकित शिक्षण संस्थांचे प्रमुखही या चर्चेत सहभागी झाले.
परिसंवादात बोलताना आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर वाढला असून त्यामुळे दूषित वातावरण तयार होत आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांची पायमल्ली करत आहेत. अमली पदार्थांचे प्रमाणही वाढताना दिसते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तसेच शिक्षण संस्थांनीही पोलिसांना सहकार्य करून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. शाळा–महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू व मद्यविक्री करणारी दुकाने बंद करणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी शिक्षण संस्थांनीही याबाबत पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
डॉ. गोसावी म्हणाले, पुणे शहराचे शैक्षणिक वातावरण जागतिक दर्जाचे असून इथं विविध देशांतील विद्यार्थी येतात. डॉ. मुजुमदार म्हणाले, गेल्या काही दशकांत पुण्यातील शिक्षण प्रणालीत मोठे परिवर्तन झाले असून विद्यार्थी शिस्तीबाबत सातत्याने चर्चा आणि समुपदेशनाची गरज आहे. विविध प्रदेशांतील विद्यार्थ्यांचे मिश्रण असल्याने प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशन केंद्र असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments are closed.