भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) प्रचंड उसळी घेतली. गुंतवणूकदारांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला असून, सेन्सेक्स तब्बल १,१०० अंकांनी वाढून ८१,७०० पातळीवर पोहोचला, तर निफ्टी ३५० अंकांच्या वाढीसह २४,९८० वर स्थिरावला. या बंपर तेजीमुळे गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ हिरवेगार झाले असून, बाजारातील वातावरण प्रचंड सकारात्मक झाले आहे.

बाजार भांडवलात विक्रमी वाढ
बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल ५.९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली असून, एकूण मार्केट कॅप ४५१ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. ही वाढ गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे द्योतक मानली जात असून, बाजारातील खरेदीचा जोर प्रचंड वाढलेला दिसतो.
ऑटो आणि कंझ्युमर शेअर्समध्ये झेप
सेक्टरल स्तरावर पाहता, ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये मोठी उसळी दिसली. निफ्टी ऑटो ४.४% ने वधारला, तर निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स ३% ने वाढला. याचबरोबर फायनान्सिअल शेअर्समध्येही खरेदीचा ओघ सुरू राहिल्याने निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.७% वाढले. आयटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही तेजीची लाट होती.
टॉप गेनर्स शेअर्स
सेन्सेक्सवरील टॉप गेनर्समध्ये मारुतीचा शेअर तब्बल ७.५% वाढून अव्वल स्थानी राहिला. बजाज फायनान्स ६%, एम अँड एम ५%, अल्ट्राटेक सिमेंट ४.५%, बजाज फिनसर्व्ह ४.२%, ट्रेंट ४%, हिंदुस्तान युनिलिव्हर ३.२% आणि टाटा मोटर्स २% ने वाढले. याउलट एलटी, इन्फोसिस, सन फार्मा आणि एचसीएल टेकसारख्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली.
तेजीमागील मुख्य घटक
या विक्रमी वाढीमागे काही महत्त्वाचे घटक दिसून येतात. सर्वप्रथम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटीमध्ये सुधारणा करून केवळ ५% आणि १८% असे दोनच स्लॅब ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. या घोषणेमुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला असून, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारांचा प्रभाव
भारतीय बाजाराबरोबरच आशियाई बाजारातही तेजीचा सूर होता. जपानचा निक्केई, शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक वाढला. अमेरिकेतील शेअर बाजारातही प्रचंड तेजी दिसून आल्याने भारतीय गुंतवणूकदारांना सकारात्मक संकेत मिळाले.
कच्च्या तेलाच्या दरात घसरण
कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेल्या किरकोळ घसरणीमुळे भारताला मोठा फायदा झाला आहे. तेल आयातीवरील खर्च कमी होण्याची शक्यता असून, यामुळे महागाईचा दबाव कमी झाला आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्यामागे हा घटकही महत्त्वाचा मानला जात आहे.
अमेरिका-रशिया कराराचे परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त टॅरिफ लादणार नसल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भारताच्या आयात खर्चावर होणारा संभाव्य ताण टळला आहे. परिणामी, भारतीय शेअर बाजाराला याचा सकारात्मक परिणाम जाणवला आहे.
एकूणच पाहता, जीएसटी सुधारणांचा आशावाद, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, कच्च्या तेलाच्या घसरत्या किंमती आणि अमेरिका-रशिया संबंधातील सुधारणा या सर्व घटकांनी मिळून भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी आणली आहे.

Comments are closed.