परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी तसेच शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत अचूक व वेळेत माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने एक महत्त्वाचा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्य मंडळाने अधिकृत संकेतस्थळासह मोबाइल अॅप, युट्यूब चॅनल तसेच एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप चॅनल्सच्या अधिकृत लिंक्स उपलब्ध करून दिल्या आहेत.

राज्य मंडळाच्या वतीने सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना, ही अधिकृत डिजिटल माध्यमांची माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत तात्काळ पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांना सबस्क्राइब करावे, जेणेकरून परीक्षा संदर्भातील महत्त्वाच्या सूचना, वेळापत्रक, निर्णय व बदल थेट आणि तत्काळ मिळू शकतील, असे आवाहन करण्यात आले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, अत्यंत महत्त्वाच्या सूचना, परिपत्रके आणि मार्गदर्शक माहिती याच अधिकृत डिजिटल माध्यमांद्वारेच प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा अप्रामाणिक माहितीकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांनी या उपक्रमाची दखल घेत, शाळा प्रशासनाने या बाबीची नोंद घ्यावी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती तातडीने पोहोचवावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व डिजिटल माध्यमांच्या लिंक्स उपलब्ध असून, हा उपक्रम पालक, शाळा आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचा मजबूत दुवा ठरणार असल्याचे चित्र आहे.

Comments are closed.