ज्यांच्या आवाजात महाराष्ट्राची संस्कृती घुमते, ज्यांच्या पावलांनी रंगभूमी उजळली — त्या तमाशा कलावंतांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. दीड वर्षांपासून शासनाकडून मिळणारे मानधन थांबल्याने हे कलावंत आर्थिक संकटात सापडले आहेत.
तमाशा ही केवळ नाचगाणी नव्हे — ती ग्रामीण संस्कृतीची आत्मा आहे. पण आज हीच आत्मा उपाशी आहे. १८ महिन्यांपासून एकही हप्ता न मिळाल्याने वृद्ध कलावंतांच्या घरी चुली विझल्या आहेत. काहींना मजुरीकडे वळावे लागले, तर काही आजारपणातही उपचारांशिवाय पडून आहेत.
“आम्ही आयुष्यभर लोकांना हसवलं, रडलं, विचार दिला… पण आता आमचं शासनाने विसर पाडला.” — रणधीर मोहिते, राष्ट्रपती प्रशस्तीपत्र विजेते ज्येष्ठ तमाशा कलावंत शासनाने मे 2024 पासून मानधन थांबवलं असून, प्रत्येक कलावंताचे सुमारे ₹90,000 थकित आहेत. या मानधनात वाढ होऊन ₹5,000 प्रतिमहा करण्यात आली होती, पण वाढलेलं तर दूर, आधीचंही काही मिळालं नाही.
७५ वर्षांवरील अनेक कलावंत आज वृद्धापकाळ, अंधत्व आणि आजारपणाशी झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी हे मानधन म्हणजे जगण्याचं एकमेव साधन होतं. दिवाळीत तरी शासन मदत करेल, अशी अपेक्षा होती — पण आशा फोल ठरली.
या स्थितीमुळे तमाशा संस्कृतीचं भविष्यच धोक्यात आलं आहे. गावोगावी आपल्या कलेने लोकांना आनंद देणारे हे कलाकार आज स्वतः अंधारात उभे आहेत — आणि शासन मात्र मौन धारण करून बसलं आहे.

Comments are closed.