मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले होते. त्यातील २१ प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात देण्याचा आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
जोगेश्वरीतील साईबाबा सहकारी गृहनिर्माण संस्था, कुर्ला नेहरूनगरमधील श्रमिकनगर आणि चेंबूरमधील जागृती संस्थांचे अपूर्ण प्रकल्प म्हाडामार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत. सध्या एसआरएच्या २२८ योजना रखडलेल्या असून त्यातील २१ प्रकल्प म्हाडाच्या भूखंडावर असल्याने, म्हाडा स्वतः हे प्रकल्प मार्गी लावणार आहे.
या नव्या निर्णयामुळे १७,३२१ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार असून, १६,२८६ घरे विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्याचबरोबर, रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प एमएमआरडीए आणि एसआरएच्या संयुक्त भागीदारीत राबवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे तब्बल १६,५७५ झोपडीधारकांना पुनर्वसनाचा लाभ मिळेल.
सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना नवे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे.