राज्यभरातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा फरक देण्याचे राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते; मात्र संबंधित रक्कम न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा हप्ता मिळालेला नसल्यामुळे ही कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. येत्या १० तारखेपर्यंत वाढीव वेतनाचा फरक न दिल्यास नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी साधारण ४७५ कोटी रुपये खर्च येतो, तर वाढीव वेतनवाढीचा फरक देण्यासाठी दरमहा सुमारे ५८ कोटी ३० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद आवश्यक आहे. २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढीच्या फरकासाठी राज्य सरकार दरमहा सुमारे ६५ कोटी रुपये देईल, अशी घोषणा ऑक्टोबर २०२५ मध्ये करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ही रक्कम एसटी महामंडळाला मिळालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा जपण्यासाठी महामंडळाने स्वतःच्या निधीतून दोन महिन्यांचा वेतनफरक कर्मचाऱ्यांना अदा केला.
तथापि, या महिन्यात तीन महिन्यांचा एकत्रित ११६.६९ कोटी रुपयांचा फरक देण्याची मागणी करूनही निधी उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांना फरकाविना वेतन देण्यात आले. आधीच महामंडळावर सुमारे ४२०० कोटी रुपयांची देणी थकीत असताना वाढीव वेतनाचा हप्ता न देणे ही कर्मचाऱ्यांची सरळ अवहेलना असल्याचे संघटनेने म्हटले आहे. येत्या काही दिवसांत वेतनफरकाची रक्कम न मिळाल्यास एसटी कर्मचारी तीव्र आंदोलन छेडतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed.