रत्नागिरी विभागीय राज्य परिवहन महामंडळाकडून शिकाऊ उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत एकूण ४३४ पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२५
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज apprenticeshipindia.org या अधिकृत संकेतस्थळावर करावा लागेल. तसेच आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज देखील राज्य परिवहन महामंडळ, रत्नागिरी विभागीय कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांत
या भरतीसाठी अर्जदारांनी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज नोंदवल्यानंतर त्याची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे विभागीय कार्यालयात प्रत्यक्ष सादर केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
प्रशिक्षणाचा कालावधी – एक वर्ष
भरती झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी देण्यात येईल. या कालावधीत उमेदवारांना आवश्यक कौशल्य, कार्यशाळा अनुभव व प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाईल.
उपलब्ध रिक्त पदांची माहिती
- यांत्रिक डिझेल – ११०
- यांत्रिक मोटारगाडी – ११०
- बीजतंत्री (Electrician) – ६०
- पत्राकारागीर (Sheet Metal Worker) – ४४
- सांधाता (Welder) – २५
- कातारी (Turner) – १०
- यंत्र कारागीर (Machinist) – १०
- रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग – ५
- साठा जोडारी (Steno) – ४४
- सुतार – ४
- रंगारी – १०
- शिवणकाम – २
भरतीवरील अंतिम अधिकार
या भरती प्रक्रियेत जागांची संख्या वाढवणे, कमी करणे, अंशतः बदल करणे किंवा भरती रद्द करण्याचा अंतिम अधिकार विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, रत्नागिरी यांच्याकडे राहील.
रोजगाराची सुवर्णसंधी
ही भरती प्रक्रिया तरुणांसाठी केवळ रोजगाराची संधी नाही, तर प्रतिष्ठित राज्य परिवहन विभागाशी जोडले जाण्याची सुवर्णसंधी आहे. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना कार्यशाळा कौशल्यात उत्तम अनुभव मिळेल, ज्याचा उपयोग भविष्यातील कारकिर्दीसाठी मोलाचा ठरेल.
विभागाचे आवाहन
“उमेदवारांनी विहित वेळेत अर्ज दाखल करावेत. ही संधी हातातून जाऊ देऊ नका,” असे स्पष्ट आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.