दहावी पेपरफुटी प्रकरणाचा पर्दाफाश; टेलिग्रामवर बनाव करून विद्यार्थ्यांची फसवणूक! | Fake SSC Paper Leak Scam on Telegram!

Fake SSC Paper Leak Scam on Telegram!

दहावीच्या गणिताच्या पेपरफुटीच्या चर्चेला अखेर मोठा ट्विस्ट मिळाला आहे. पोलिस तपासात दहावीचा गणिताचा पेपर प्रत्यक्षात फुटलेलाच नव्हता, मात्र प्रश्नपत्रिका मिळवून देतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नर्सिंगचा अभ्यास करणाऱ्या १८ वर्षीय चैतन्य शेंडे या विद्यार्थ्याला पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी चंद्रपूरमधून अटक केली आहे.

Fake SSC Paper Leak Scam on Telegram!

शिक्षण मंडळाला टेलिग्रामवर दहावीच्या गणित भाग-१ आणि भाग-२ चा पेपर फुटल्याची शंका आल्याने शिक्षण विभागाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिन आणि सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी चंद्रपूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे जाऊन चैतन्यला अटक केली.

पोलिस चौकशीत समोर आले की, आरोपीने टेलिग्रामचा वापर करून पेपरफुटीचा बनाव रचला होता. तो परीक्षेच्या आदल्या दिवशी टेलिग्राम ग्रुपवर पासवर्ड असलेली एक पीडीएफ फाईल अपलोड करायचा आणि “दहावीचा पेपर मिळेल” असा संदेश देत विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी ६०० रुपये मागायचा. पेपर मिळेल या आशेने अनेक विद्यार्थ्यांनी पैसे पाठवले; मात्र पैसे मिळाल्यानंतर आरोपी त्यांचे नंबर ब्लॉक करायचा.

इतकेच नव्हे तर ज्या दिवशी परीक्षा संपायची त्याच दिवशी संध्याकाळी तो पीडीएफ फाईलमध्ये फेरफार करून त्यात त्या दिवशी झालेला पेपर अपलोड करायचा आणि तोच पेपर आधी दिला होता असा भास निर्माण करायचा. पोलिस तपासात आरोपीने ही फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. चैतन्य शेंडे हा नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून चंद्रपूरचा रहिवासी असल्याचेही समोर आले आहे.

या घटनेमुळे पेपरफुटीबाबत पसरत असलेल्या अफवांवर पडदा पडला असून, विद्यार्थ्यांनी अशा फसव्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.