फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 23 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत, तर दहावीच्या परीक्षा 2 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार आहेत.

डॉ. माळी यांनी स्पष्ट केले की, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी बैठक क्रमांकानुसार ऑनलाइन नोंदविलेल्या गुणांची अंतिम यादी तयार करून त्यावर अंतर्गत व बाह्य परीक्षकांच्या तसेच विषय शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. संबंधित गुणतक्त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या स्वाक्षरीनंतर हे सर्व गुणतक्ते निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे सिलबंद पाकिटामध्ये जमा करणे बंधनकारक आहे. पाकिटावर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अतिविलंब शुल्कासह अर्ज केलेले, बैठक क्रमांक उपलब्ध नसलेले किंवा ऐनवेळी विषय बदल केलेल्या विद्यार्थ्यांचे गुणही प्रचलित पद्धतीने निश्चित तारखेस विभागीय मंडळाकडे सादर करावे लागणार आहेत. गतवर्षीप्रमाणेच, ‘आऊट ऑफ टर्न’ पद्धतीने घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच आयोजित केल्या जाणार आहेत. नियमित कालावधीत गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांनाच ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी बैठक क्रमांक दिले जातील.
तसेच, सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी गुण नोंदणी व ऑनलाइन पाठविण्याबाबतच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करून त्याचा अहवाल राज्य मंडळ कार्यालयास सादर करावा, असेही डॉ. दीपक माळी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Comments are closed.