राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षांच्या अर्जप्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे परीक्षा अर्ज लेखी परीक्षेच्या अगदी आदल्या दिवसापर्यंत स्वीकारले जाणार नसून, ते परीक्षेच्या तब्बल २० दिवस आधीच बंद केले जाणार आहेत. या निर्णयानुसार बारावीचे परीक्षा अर्ज अंतिम मुदत २१ जानेवारी, तर दहावीचे अर्ज ३० जानेवारीपर्यंत स्वीकारले जातील.

मंडळाकडून परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले असून, त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याच्या तारखा व शुल्कांचा तपशीलही जाहीर करण्यात आला आहे. याआधी परीक्षेच्या तोंडावर, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज स्वीकारले जात असल्याने नियोजनात अडचणी येत होत्या.
राज्यभरातील विभागीय मंडळांकडून सातत्याने ही मागणी होत होती. शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज स्वीकारल्यामुळे कोणत्या केंद्रावर किती विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, हे निश्चित करणे अवघड जात होते. २० दिवस आधी अर्जप्रक्रिया बंद ठेवल्यास केंद्रनिहाय विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करणे, परीक्षा व्यवस्थापन व नियोजन अधिक सोपे होणार असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, ३० जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. तर बारावीच्या अर्जांसाठी अतिविलंब, विशेष अतिविलंब व अतिविशेष अतिविलंब शुल्काची दिवसागणिक माहिती स्पष्टपणे जाहीर करण्यात आली आहे.
“पूर्वी शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज स्वीकारले जात होते. आता परीक्षा सुरू होण्याच्या २० दिवस आधी अर्ज प्रक्रिया बंद होणार असून, शुल्क व तारखांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे,” असे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी स्पष्ट केले आहे.
हा निर्णय परीक्षेच्या तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षण क्षेत्रात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

Comments are closed.