दहावी आणि बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया आता परीक्षेच्या किमान २० दिवस आधीच बंद केली जाणार आहे.
या निर्णयानुसार बारावीचे अर्ज २१ जानेवारीपर्यंत, तर दहावीचे अर्ज ३० जानेवारी २०२६ पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
यापूर्वी लेखी परीक्षेच्या अगदी आदल्या दिवसापर्यंतही अर्ज भरण्याची मुभा होती. मात्र, फेब्रुवारी–मार्च २०२६ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, अर्ज प्रक्रियेत निश्चितता आणण्यासाठी राज्य मंडळाने ही नवी नियमावली लागू केली आहे. यासोबतच अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्काच्या तारखा व रकमेचाही तपशील जाहीर करण्यात आला आहे.
दहावी परीक्षेसाठी सध्या अतिविलंब शुल्काने अर्ज प्रक्रिया सुरू असून, अतिविशेष अतिविलंब शुल्कासह अंतिम तारीख ३० जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. तर बारावी परीक्षेसाठी २१ जानेवारी ही अंतिम मुदत राहणार असून, दिवसागणिक लागू होणाऱ्या अतिरिक्त शुल्काचा सविस्तर तक्ता मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हा निर्णय राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या मागणीनुसार घेण्यात आला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज स्वीकारल्यामुळे परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांची नेमकी संख्या ठरवणे अवघड जात होते. अर्जांची अंतिम तारीख आधीच निश्चित केल्याने नियोजन अधिक सुलभ होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
राज्य मंडळाच्या या निर्णयामुळे परीक्षा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होईल, मात्र परीक्षेच्या तोंडावर घेतलेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात चर्चा रंगली आहे.

Comments are closed.