SSC–HSC परीक्षा २०२६वर निवडणुकांचे सावट; कर्मचारी नियुक्तीमुळे चिंता वाढली! | Elections Cast Shadow on SSC-HSC 2026 Exams!

Elections Cast Shadow on SSC-HSC 2026 Exams!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा परिणाम दहावी-बारावीच्या परीक्षा २०२६ वर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर नियुक्ती झाल्याने परीक्षा नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षा मंडळाच्या विभागीय कार्यालयात मंजूर पदांच्या केवळ ५० टक्के कर्मचारी कार्यरत असून, १२० मंजूर पदांपैकी सध्या फक्त ५८ कर्मचारी उपलब्ध आहेत.

Elections Cast Shadow on SSC-HSC 2026 Exams!

या ५८ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल २८ कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आले आहे. ही पहिली यादी असून, पुढील टप्प्यात आणखी कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पहिल्याच टप्प्यात जवळपास ६० टक्के कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले असल्याने, परीक्षेपूर्व तयारी, केंद्र निश्चिती, गोपनीय कामकाज आणि व्यवस्थापनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर यांच्या माहितीनुसार, फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या SSC आणि HSC परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले असून, १० फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार आहेत. त्याआधी प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करायचे आहे. परीक्षा नियोजनाची लगबग सुरू असतानाच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवडणूक कामासाठी गेल्यास परीक्षा पूर्वतयारीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विभागांतर्गत पाचही जिल्ह्यांतून दरवर्षी सुमारे चार लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसतात. मात्र यंदा परीक्षा केंद्रांची निश्चिती प्रक्रिया उशिराने सुरू असल्याने त्यात आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक कामकाजातून परीक्षा मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले आहे.

निवडणुका आणि परीक्षा या दोन्ही महत्त्वाच्या प्रक्रियांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य तो निर्णय वेळेत घेतला जावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

Comments are closed.