MSBSHSE 2026 दहावी आणि बारावी परीक्षांसाठी आता परीक्षागृहांमध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून ही नवीन नियमावली लागू केली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर CCTV सुविधा उपलब्ध नसेल, त्यांना मान्यता मिळणार नाही.
नाशिक विभागीय मंडळ या वर्षी सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV यंत्रणांची चाचपणी करत आहे. परीक्षेच्या तयारीसाठी केंद्रांवर मार्गदर्शक बैठकाही घेतल्या जात आहेत, ज्यात केंद्राचे नाव, विद्यार्थी संख्या, वर्ग खोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, अग्निशमन यंत्रणा व CCTV कॅमेरांची संख्या याबाबत माहिती सादर करावी लागते.
राज्य सरकारने १३ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार, सर्व शाळांमध्ये CCTV बसविणे बंधनकारक आहे. यापूर्वी दहावी-बारावी परीक्षांमध्ये ही सुविधा अनिवार्य नव्हती; मात्र २०२६ पासून हे बंधनकारक करण्यात आले आहे.
हे निर्णय विद्यार्थी सुरक्षा आणि कॉपीमुक्त परीक्षा यांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांना अन्य आवश्यक सुविधांसह CCTV सुविधा सुनिश्चित करणे गरजेचे आहे, अन्यथा त्या केंद्राला परीक्षा घेण्याची मान्यता मिळणार नाही, असे नाशिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे यांनी सांगितले.

Comments are closed.