महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) अंतर्गत होणारी दहावी (SSC) बोर्ड परीक्षा 2026 ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाने काही कडक नियम व स्पष्ट सूचना जारी केल्या असून, त्या सर्व विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे.

दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट अनिवार्य असून, ते शाळेमार्फत वेळेत घेऊन त्यावरील सर्व तपशील नीट तपासणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवावे. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, डिजिटल घड्याळे किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच बाहेरून आणलेले नोट्स, कागद, पेपर्स किंवा कोणतीही चिटशीट जवळ बाळगल्यास कॉपीचा प्रकार मानून कठोर कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणात विद्यार्थ्याला परीक्षा हकालपट्टी, पेपर रद्द किंवा पुढील परीक्षांपासून वंचित ठेवले जाऊ शकते.
विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी साधे व स्वच्छ कपडे परिधान करावेत. जड दागिने, इलेक्ट्रॉनिक भाग असलेली घड्याळे किंवा मोठ्या खिशांचे कपडे टाळावेत, जेणेकरून सुरक्षा तपासणी सुलभ होईल आणि प्रवेशास अडथळा येणार नाही.
उत्तर लिहिताना फक्त ब्लू किंवा ब्लॅक पेन वापरण्याची परवानगी आहे. स्केच पेन, व्हाइटनर किंवा अन्य साहित्य वापरणे निषिद्ध आहे. चुकीच्या रंगातील शाई वापरल्यास उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
परीक्षा केंद्रावर किमान 20 ते 30 मिनिटे आधी पोहोचणे, हॉलमध्ये शांतता राखणे आणि इतर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास न देणे आवश्यक आहे. परीक्षेदरम्यान कोणतीही अनुचित वर्तणूक बोर्ड नियमांनुसार गंभीर गुन्हा मानली जाऊ शकते.
बोर्ड परीक्षेला बसण्यासाठी शाळेमार्फत ई-हॉल तिकीट, अर्ज प्रक्रिया, फी भरणे व तपशीलांचे सत्यापन वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी APAAR ID नोंदणी डिजिटल गुणपत्रिका व भविष्यातील शैक्षणिक नोंदींसाठी अनिवार्य करण्यात आली आहे.
महत्त्वाची टीप:
परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रवेशपत्र, ओळखपत्र, आवश्यक पेन आणि बोर्डाच्या सूचनांची खात्री करून घ्या. मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा हॉलमध्ये अजिबात नेऊ नका आणि सर्व नियमांचे पालन करून शांतपणे परीक्षा द्या.

Comments are closed.