सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची मुदत विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी 8 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत होते. मात्र, पात्र उमेदवारांना अधिक संधी मिळावी या उद्देशाने आता अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

याआधी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली असून, नवीन उमेदवारांनाही आता पुन्हा अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना 8 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येईल. तसेच, भरलेल्या अर्जाची छायांकित प्रत 26 डिसेंबरपर्यंत विद्यापीठात सादर करावी लागणार आहे.
राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदांच्या मोठ्या संख्येने जागा रिक्त असून, या भरतीसाठी आतापर्यंत तीन वेळा जाहिरात प्रसिद्ध होऊनही प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही भरतीदेखील विविध कारणांमुळे रखडलेली असून, त्यातूनच पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, 6 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर झालेल्या अध्यादेशानुसार प्राध्यापक भरतीसाठी काही निकष निश्चित करण्यात आले होते. मात्र, या अध्यादेशात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, भविष्यात नव्या निकषांनुसार पुन्हा अर्ज प्रक्रिया राबवावी लागू शकते, अशी शक्यता आहे. या सगळ्या गोंधळामुळे पात्र उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.