Savitribai Phule Pune University (SPPU) मार्फत पीएचडी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न विविध संशोधन केंद्रांमधील रिक्त जागांसाठी अतिरिक्त प्रवेश फेरी जाहीर करण्यात आली असून, संशोधन केंद्र निवडण्याची ऑनलाइन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. प्रवेशासाठी पात्र असलेले विद्यार्थी त्यांच्या लॉगिनमधून संशोधन केंद्राची निवड करू शकतात. ही प्रक्रिया १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करणे आवश्यक आहे.

विद्यापीठाच्या पीएचडी पोर्टलवर पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रांतील रिक्त जागांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या व जवळील संशोधन केंद्राची निवड करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, ५ मार्च ते २० मार्च या कालावधीत PET परीक्षा उत्तीर्ण तसेच PET मधून सूट मिळालेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
संशोधन केंद्र निवड प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आयटी सपोर्ट विभागाशी संपर्क साधावा. यासाठी ०२०-७१५३३६३३ या क्रमांकावर किंवा ph*****************@************ac.in या ईमेलवर संपर्क साधता येईल.
या शैक्षणिक वर्षात यापूर्वी दोन प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या होत्या; मात्र अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही अतिरिक्त फेरी आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी प्रसिद्ध केले आहे.

Comments are closed.