सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिष्ठाता आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वीची प्रक्रिया रद्द करून विद्यापीठानं नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
इच्छुक उमेदवारांना १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी दिली.
सध्या विद्यापीठात विज्ञान-तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखा, वाणिज्य-व्यवस्थापन आणि मानव्यविद्या या चार शाखांचे अधिष्ठाता; तसेच परीक्षा संचालक हे सर्व प्रभारी स्वरूपात कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजावर आणि राष्ट्रीय रँकिंगवरही परिणाम होत असल्याचं शैक्षणिक वर्तुळात मानलं जातं.
माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रभारी अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर सध्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी काही बदल केले. मात्र, गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. त्यामुळे विद्यापीठानं आता ही पदे भरून स्थिरता आणण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने नुकतेच अधिष्ठाता, कुलसचिव आणि इतर वरिष्ठ पदांसाठी पात्रतेचे नवे नियम जाहीर केले आहेत. मात्र, नियोजित प्रक्रियेला वेळ लागल्यास नव्या अधिष्ठात्यांना केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल, कारण तो कुलगुरूंच्या उर्वरित कार्यकाळाशी जोडलेला आहे.
दरम्यान, परीक्षा संचालकपदाचे अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे आहे. आता या पदासाठीही स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, अर्ज आणि पात्रतेचे सर्व तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज दाखल करण्याचं आवाहन डॉ. भाकरे यांनी केलं आहे.

Comments are closed.