राज्यातील प्राथमिक (जिल्हा परिषद) शाळांमधील शारीरिक शिक्षण बळकट करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने थेट ४,८६० क्रीडा शिक्षक पदांना मंजुरी दिली असून, प्रत्येक समूह साधन केंद्रासाठी एक क्रीडा शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षणाला नवी चालना मिळणार आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये प्राथमिक स्तरावर एकूण २ लाख ३६ हजार २२८ पायाभूत शिक्षक पदे निश्चित करण्यात आली आहेत. २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार समूह साधन केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली असून, सध्या राज्यात ४,८६० समूह साधन केंद्रे अस्तित्वात आहेत. १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचे निकष सुधारित करताना, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) म्हणून प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आणि त्यामुळे स्वतंत्र असा ४,८६० पदांचा क्रीडा शिक्षक संवर्ग तयार झाला आहे.
याच धर्तीवर ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) यांच्यासाठीही प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले असून, त्याचाही स्वतंत्र ४,८६० पदांचा संवर्ग निर्माण करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील मंजूर पायाभूत पदांची मर्यादा न ओलांडता हे दोन स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यात आल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जिल्हानिहाय क्रीडा शिक्षक पदांची संख्याही निश्चित करण्यात आली आहे.
या नव्या धोरणामुळे आतापर्यंत अनेक शाळांमध्ये जाणवणारी नियमित शारीरिक शिक्षणाची कमतरता दूर होण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन आणि शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, याच वेळी अनुदानित शाळांमधील क्रीडा शिक्षकांच्या कमतरतेकडे शिक्षक संघटनांनी लक्ष वेधले आहे. पवित्र पोर्टलमार्फत होणारी भरती प्रक्रिया, रोस्टर मंजुरीतील विलंब आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे अनुदानित शाळांतील भरती रखडत असल्याची तक्रार शिक्षणतज्ज्ञ व माजी मुख्याध्यापक सुदाम कुंभार यांनी केली आहे.
शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार काही जिल्ह्यांतील क्रीडा शिक्षक पदांचे वाटप पुढीलप्रमाणे आहे — पुणे (३०६), रत्नागिरी (२५१), अहिल्यानगर (२४६), नाशिक (२४४), रायगड (२२८), सातारा (२२३), भंडारा (६०), हिंगोली (६८), वाशिम (७१) आणि धाराशिव (८०). या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांमधील क्रीडा शिक्षणाला नवे बळ मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी आणि सक्रीय जीवनशैलीकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

Comments are closed.