सोलापूर विद्यापीठाने उन्हाळी सत्र २०२६ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून परीक्षा २ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहेत. बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन (बीओएई) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पदवी, पदव्युत्तर तसेच अभियांत्रिकीसह विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे २०२६ अखेरपर्यंत चालणार आहेत.

या परीक्षा दररोज तीन सत्रांमध्ये घेतल्या जाणार आहेत—सकाळी ९ ते १२, दुपारी १२ ते ३ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा संबंधित महाविद्यालयांतच होणार असून पदव्युत्तर व अभियांत्रिकीच्या परीक्षा नियुक्त परीक्षा केंद्रांवर पार पडतील. यासाठी एकूण १०९ परीक्षा केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.एस्सी., एम.कॉम., एलएलबी आणि अभियांत्रिकीसह एकूण २८४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार असून सुमारे ७९ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर निकाल तात्काळ जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तीन भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून ही पथके अचानक केंद्रांना भेट देऊन तपासणी करणार आहेत.

Comments are closed.