महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सहायक आयुक्त, समाजकल्याण व गट-अ या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, केदार गरड याने राज्यात प्रथम क्रमांक, तर वैभव भुतेकर याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मे २०२३ मध्ये समाजकल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्यभरातील हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार समाजकल्याण अधिकारी गट-अ पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली आणि १५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत मुलाखती पार पडल्या.
या परीक्षेचा निकाल जाहीर करताना आयोगाने स्पष्ट केले आहे की, सध्याची गुणवत्ता यादी ही केवळ तात्पुरती आहे. उमेदवारांच्या अर्जातील दावे, प्रमाणपत्र पडताळणी आणि आवश्यक दस्तऐवज तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकालात बदल होऊ शकतो. त्यामुळे काही उमेदवारांच्या शिफारशींमध्ये सुधारणा अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
आयोगाने यासोबतच स्पष्ट केले की, निकाल न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहणार आहे, आणि सर्व उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अद्यतने तपासावीत, अशी सूचना देण्यात आली आहे.

Comments are closed.