आजच्या डिजिटल युगात लहान वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन पोहोचले आहेत. सोशल मीडियावरील सततचा वापर, आकर्षक कंटेंट आणि आभासी स्पर्धेमुळे मुलांचे अभ्यासातील लक्ष कमी होत असल्याची गंभीर चिंता जगभर व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देश सोशल मीडियावर कडक निर्बंध घालण्याच्या तयारीत आहेत.
ऑनलाईन बुलिंग, वाढता मानसिक ताण आणि आक्रमक वर्तन लक्षात घेता फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांची इच्छा आहे की हा कायदा येत्या सप्टेंबरपासून लागू व्हावा.
या प्रस्तावित कायद्यानुसार फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅटसह सर्व सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सवर अल्पवयीन मुलांना प्रवेश नाकारला जाईल. तसेच ज्या डिजिटल माध्यमांमधून मुलांमध्ये थेट ऑनलाईन संपर्क साधता येतो, अशा सर्व “सोशल फीचर्स”वरही निर्बंध असतील. मुलांना डिजिटल जगातील धोके, मानसिक दबाव आणि व्यसनाधीनतेपासून वाचवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
मॅक्रों यांनी याआधीही सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये वाढणारी हिंसा आणि चिडचिडी वृत्ती यावर कठोर भूमिका घेतली होती. ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालून जगात पहिलाच पायंडा पाडला असून, फ्रान्सही त्याच मार्गाने पुढे जात आहे.
कायद्याचे समर्थन करताना खासदार लॉर मिलर म्हणाल्या की, “सोशल मीडिया निरुपद्रवी नाही. आजची मुले कमी अभ्यास करतात, कमी झोप घेतात आणि सतत स्वतःची तुलना इतरांशी करतात. ही फक्त तांत्रिक नव्हे, तर मानसिक लढाई आहे.”
ऑस्ट्रेलियानंतर ब्रिटन, डेन्मार्क, स्पेन, ग्रीससारखे देशही या मॉडेलचा विचार करत आहेत. युरोपियन संसदेकडूनही सोशल मीडिया वापरासाठी किमान वयोमर्यादा ठरवण्याची मागणी होत आहे.
फ्रान्समध्ये या निर्णयाला राजकीय स्तरावरच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. काही खासदारांनी याला “मुलांच्या आरोग्यासाठीची आपत्कालीन गरज” असे संबोधले असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत सर्वाधिक मुलांनाच मोजावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.