राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना टीईटी (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण होण्यासाठी आता एकूण सहा संधी मिळणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत देण्यात आली असून, त्या अनुषंगाने राज्य शासनाला विद्यमान शासन निर्णय (GR) बदलावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता दरवर्षी दोन वेळा टीईटी परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पहिली टीईटी जूनअखेर–जुलै मध्ये, तर दुसरी नोव्हेंबर मध्ये होणार आहे. तसेच २०२७-२८ मध्ये पहिली परीक्षा जून २०२७ मध्येच घेतली जाईल, कारण निकाल ३१ ऑगस्टपूर्वी जाहीर करणे बंधनकारक आहे.
या नियमांतर्गत वय ५३ वर्षांपर्यंतचे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक असेल. मुदतीत पात्रता न पूर्ण केल्यास सक्तीची सेवानिवृत्ती होऊ शकते. पुढील काळात पदोन्नतीसाठीही टीईटी अनिवार्य असणार आहे.
आतापर्यंत टीईटीचा निकाल अत्यंत कमी लागल्याने (मागील परीक्षेत १२% पेक्षाही कमी उमेदवार उत्तीर्ण) शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे राज्य सरकार या प्रस्तावाला तातडीने मान्यता देणार का, याकडे राज्यातील सुमारे पावणेदोन लाख शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.