सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून बजाज ऑटो, छत्रपती संभाजीनगर आणि टाटा मोटर्स या नामांकित औद्योगिक कंपन्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. रूपाली पालोदकर होत्या, तर उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. रूपाली पालोदकर यांनी “ग्रामीण भागातील तरुणांनी तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून बदलत्या औद्योगिक जगाशी जुळवून घ्यावे,” असे आवाहन केले.
बजाज ऑटो, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विनायक मुळे यांनी कंपनीची कार्यपद्धती, प्रशिक्षण प्रक्रिया तसेच विविध पदांसाठी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर टाटा मोटर्सच्या वतीने कृष्णा कोल्हे यांनी कंपनीतील करिअरच्या संधी, कामाचे स्वरूप आणि अपेक्षित कौशल्यांबाबत माहिती दिली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना “शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान संपादन करून स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहावे,” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेलचे प्रा. डॉ. अंकुश जाधव यांनी केले. प्रा. नीलेश मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. रवी मिरगे यांनी आभार मानले.
हा रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी नवी दिशा देणारा उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Comments are closed.