सिडको भरतीत गोंधळ – पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह! | Sidco Recruitment Controversy!

Sidco Recruitment Controversy!

सिडकोमध्ये सुरू असलेली नोकरभरती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ आणि विधी अधिकारी या पदांसाठी झालेल्या परीक्षांनंतर प्रशासनाने कोणतीही गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर न करता काही निवडक उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. या पद्धतीमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम तर निर्माण झाला आहेच, पण भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत.

Sidco Recruitment Controversy!

मेरिट लिस्ट न जाहीर करता थेट पडताळणी
सिडकोच्या भरती प्रक्रियेत यापूर्वी नेहमीप्रमाणे लेखी आणि तोंडी परीक्षेची मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जायची. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला आपले गुण व निवड झालेल्या उमेदवारांचे गुण स्पष्ट कळत होते. मात्र यावेळी प्रशासनाने हा टप्पा वगळला आणि थेट काही ठरावीक उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले. त्यामुळे या भरतीत गुपचूप डावपेच रचले जात असल्याची शंका उमेदवार व संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

हजारो उमेदवारांचा संभ्रम
या परीक्षेला राज्यभरातील हजारो उमेदवारांनी हजेरी लावली होती. परीक्षा देताना सर्वांकडून शुल्क आकारण्यात आले होते. उमेदवारांना निकाल आणि गुणांची माहिती देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना ती पार पाडली जात नसल्याने उमेदवार संतप्त झाले आहेत. आपले किती गुण मिळाले? निवड झालेल्या उमेदवारांना किती गुण जास्त आहेत? – या मूलभूत प्रश्नांची उत्तरेच उमेदवारांना मिळत नाहीत.

मुंबई महापालिकेचे उदाहरण समोर
सिडकोप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेनेही अलीकडेच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली होती. तब्बल २७ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली आणि निकालासह सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. मग सिडकोला अशी यादी जाहीर करण्यास अडचण काय? असा सवाल ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मोकल यांनी उपस्थित केला आहे.

गैरव्यवहाराचा संशय गडद
गुणपत्रक आणि मेरिट लिस्ट न जाहीर करता थेट काही उमेदवारांचीच पडताळणी केल्याने भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून आधीच ओळखले जाणारे सिडको प्रशासन या प्रकारामुळे आणखी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. निष्पक्षता आणि पारदर्शकतेबाबत उमेदवारांचा विश्वास डळमळीत झाला आहे.

पूर्वीची पारदर्शक पद्धत गायब
पूर्वी सिडकोने प्रत्येक भरतीवेळी परीक्षेचा संपूर्ण निकाल आणि सर्व उमेदवारांचे गुण जाहीर केले होते. उमेदवारांना स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे सोपे व्हायचे. मात्र, या वेळेस ही परंपरा मोडली गेली आहे. त्यामुळे उमेदवारांना अन्याय झाल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे.

न्याय्यतेची मागणी
रमेश मोकल यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे लेखी मागणी केली आहे की, नुकत्याच झालेल्या लेखी आणि तोंडी परीक्षेत सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची संपूर्ण यादी संकेतस्थळावर प्रकाशित करावी. ही यादी सार्वजनिक केल्याशिवाय भरती प्रक्रियेवरील शंका आणि संताप दूर होणार नाही.

उमेदवारांमध्ये संतापाची लाट
या प्रकारामुळे हजारो परीक्षार्थी आक्रोशित झाले आहेत. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता नसेल तर मेहनती उमेदवारांचे भवितव्य धोक्यात येते, अशी भूमिका उमेदवारांनी घेतली आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता पुनर्स्थापित करण्याची मागणी आता तीव्र होत आहे.

Comments are closed.