राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांच्या हजारो पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक शिक्षक निवृत्त झाल्यानंतर नवीन नियुक्त्या वेळेत न झाल्याने ही टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. काही नवीन शाळा सुरू झाल्या असल्या तरी, त्यात क्रीडा शिक्षक नेमणुकीचा प्रश्न सुटलेला नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या आरोग्य, तंदुरुस्ती आणि खेळांबद्दलची आवड कमी होत असल्याबाबत पालक आणि शिक्षकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी जवळपास चार हजार क्रीडा शिक्षक सेवानिवृत्त होतात. ही पदे वेळेवर भरली जाणे अपेक्षित असते. मात्र, शासकीय प्रक्रिया, मंजुरीतील विलंब आणि प्राधान्यक्रमातील दुर्लक्ष यामुळे हजारो पदे रिक्त राहिली आहेत. मागील दोन वर्षांत शासनाने सुमारे वीस हजार शिक्षकांची भरती केली असली तरी, ती बहुतेक पदे शैक्षणिक विषयांच्या शिक्षकांसाठी होती. क्रीडा शिक्षकांची भरती मात्र नगण्य प्रमाणात झाली. त्यामुळे, ज्या पद्धतीने इतर विषयांची पदे भरली गेली, त्याच पद्धतीने क्रीडा शिक्षकांची भरती तातडीने व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
क्रीडा शिक्षकांच्या अभावामुळे शाळांमधील क्रीडा संस्कृती कमकुवत होत चालली आहे. वार्षिक क्रीडा स्पर्धा, व्यायामशाळा उपक्रम, क्रीडा पीरियड यासारख्या गोष्टी नियमितपणे होत नाहीत. विद्यार्थ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्या कौशल्यविकासात अडथळे निर्माण होत आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी खेळाडू तयार होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
खेळांचा विद्यार्थ्यांच्या मानसिक, सामाजिक आणि शारीरिक विकासात महत्त्वाचा वाटा असतो. टीमवर्क, शिस्त, नेतृत्वगुण, स्पर्धात्मक वृत्ती, सहकार्याची भावना हे गुण खेळातून विकसित होतात. तसेच खेळामुळे ताणतणाव कमी होऊन आनंदी आणि निरोगी मानसिकता तयार होते. मात्र, क्रीडा शिक्षक नसल्याने हे सर्व फायदे अनेक विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.
लहान वयात खेळांची आवड जोपासण्यासाठी आणि योग्य दिशेने प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असते. क्रीडा शिक्षकांच्या कमतरतेमुळे ही संधी गमावली जात आहे. खेळातील तांत्रिक बारकावे, नियमांचे ज्ञान, शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण – या सर्व गोष्टींचा अभाव विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळा ठरत आहे.
क्रीडा शिक्षकांचे जिल्हास्तरीय संघटनांनीही शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांचा ठाम दावा आहे की, रिक्त पदे भरली गेल्यास केवळ विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि फिटनेसवर सकारात्मक परिणाम होणार नाही, तर राज्याच्या क्रीडा क्षेत्रातही नवे खेळाडू घडतील. यासाठी शासनाने 2025-26 च्या शिक्षक भरती प्रक्रियेत क्रीडा शिक्षकांच्या पदांचा समावेश करून पोर्टलवर भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ क्षीरसागर यांनी सांगितले की, “रिक्त पदे लवकर भरल्यास शाळा स्तरावर क्रीडा संस्कृती पुन्हा जोम धरू शकेल. विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळातही प्रावीण्य मिळवतील. यामुळे राज्यातील क्रीडा पातळी उंचावेल.”

Comments are closed.