पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला प्रचाराचा मुख्य आधार बनवला आहे. स्वबळावर निवडणूक लढवणारी शिवसेना महिला मतदारांचा निर्णायक प्रभाव लक्षात घेऊन, लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधण्यावर भर देत आहे.
पक्षाचे संपूर्ण पॅनेल असलेल्या पंधरा प्रभागांमध्ये आठ महिला संघटक प्रत्यक्ष लाभार्थींशी भेटीगाठी घेणार असून, या माध्यमातून सरकारच्या विकासकामांची आणि कल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचवली जाणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे एकूण ११९ उमेदवार रिंगणात असून, त्यात ६३ महिला व ५५ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. ४१ प्रभागांपैकी पंधरा प्रभागांमध्ये शिवसेनेने चारही जागांवर उमेदवार देत भाजपासह सर्व पक्षांना थेट आव्हान दिले आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाने आक्रमक रणनीती आखली असून, लाडक्या बहिणींच्या पाठबळावर महापालिकेत सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे.
महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे लक्षात घेऊन, शहरातील विविध भागांमध्ये लहान गटांमध्ये संवाद कार्यक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्ह यांनी दिली.

Comments are closed.