कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. “मी शब्दाचा पक्का आहे; लाडक्या बहिणींना सक्षम केल्याशिवाय थांबणार नाही,” असे सांगत लवकरच ₹२१०० देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महिलांचा पाठिंबा मिळालेल्या उमेदवाराचा क्रमांक पहिला लागतो, असे सांगत शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मत देण्याचे आवाहन केले. दर महिन्याला ओवाळणी देणारा भाऊ आज तुमच्याकडे विनंती करायला आला आहे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांत शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे त्यांनी नमूद केले. निधी देताना हात आखडता घेणार नाही, “पैसे नाहीत” हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्याने प्रचार टाळता येत नाही, असे स्पष्ट करत भावनांचा आदर राखून साधेपणाने प्रचार करण्याची भूमिका शिंदे यांनी मांडली.

Comments are closed.