भरती प्रक्रिया ठप्प, शाळा प्रत्यक्ष बंद, तरीही हजारोंच्या संख्येने शालार्थ आयडी मंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शिक्षण उपसंचालक कार्यालयातून समोर आला आहे.
२०१९ ते २०२४ या कालावधीत तब्बल १० हजार ६० शालार्थ आयडी देण्यात आल्याचे उघड झाले असून, यामध्ये कोरोना काळातील मंजुरींचाही समावेश आहे.
बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. नियमबाह्यरीत्या शालार्थ प्रणालीत नावे समाविष्ट करून वेतन देण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर, राज्य शासनाने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन केले आहे. हे पथक लवकरच विभागाच्या दौऱ्यावर येणार असून, सर्व संचिकांची सखोल तपासणी केली जाणार आहे.
प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांतील वैयक्तिक मान्यता, शालार्थ मंजुरी, सेवासातत्य आणि पदबदल यांची बारकाईने छाननी होणार आहे. काही संचिका गहाळ असल्याची माहितीही समोर येत असल्याने, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील शालार्थ व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, आगामी चौकशीत नेमके काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.