सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत जून २०२५ मध्ये घेतलेली स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट (SET) अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहे. दोन महिने उलटून गेले तरी निकालाचा पत्ता नाही, आणि त्यामुळे राज्यभरातले हजारो परीक्षार्थी, विशेषतः ग्रामीण भागातले, प्रचंड तणावात आहेत.
विदर्भातल्या विद्यार्थ्यांमध्ये तर नाराजीचा सूर वाढतोय.
“परीक्षा तर दिली, पण निकाल येईना, पुढचं काय करायचं, कशावर भरवसा ठेवायचा?” – अशा भावना आता उघडपणे व्यक्त होतायत. एका उमेदवारानं सांगितलं, “नेटच्या निकालाला फक्त २२ दिवस लागले, मग सेटला दोन महिने लागतात म्हणजे काय?”
ऑफलाइन पद्धती हाच उशिरामागचा मुख्य कारण!
NET सारख्या परीक्षा सगळीकडे ऑनलाईन घेतल्या जातात, पण SET अजूनही जुन्या पद्धतीनं – पेन-पीपर फॉरमॅटमध्ये घेतली जाते. यामुळे पेपर चाचणी, स्कॅनिंग, व्हेरिफिकेशन या सगळ्या प्रक्रियांना अधिक वेळ लागतो.
याचाच परिणाम म्हणजे निकाल वेळेवर लागत नाही, आणि हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य तसंच थांबून राहतं.
पुणे विद्यापीठाकडून काहीच स्पष्टता नाही!
निकाल कधी लागणार, यावर विद्यापीठाकडून ठोस वेळसীমा जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अनिश्चितता आणखी वाढते आहे. “निकालाची वाट बघता बघता इतर संधीही निघून जातायत,” असंही काही उमेदवार सांगतात.
थोडक्यात –
विद्यार्थ्यांचा संयम संपतोय. निकाल लवकर लागावा, ऑनलाईन प्रक्रियेची अंमलबजावणी व्हावी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचं योग्य वेळेत फलित मिळावं, हीच एकमुखी मागणी आता पुढे येतेय.

Comments are closed.