तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने स्वयंरोजगाराला चालना देणारी महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांना छोट्या उद्योग-व्यवसायासाठी कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या योजनेत भाजी-फळ विक्री, झेरॉक्स-लॅमिनेशन सेंटर, स्टेशनरी दुकान, जनरल स्टोअर, बेकरी, ब्युटी पार्लर, सलून, मोबाईल शॉप, लॉन्ड्री, मसाले तयार करणे, तसेच आईस्क्रीम किंवा स्नॅक्स सेंटर यांसारख्या विविध व्यवसायांसाठी मदत मिळू शकते. याशिवाय प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मोबाईल दुरुस्ती, ए.सी. किंवा घरगुती उपकरणे दुरुस्ती अशा तांत्रिक व्यवसायांसाठी प्रशिक्षण आणि टूलकिटसाठीही कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत लघु कर्ज योजना २५ हजार रुपयांपर्यंत, मध्यम कर्ज योजना ५० हजार रुपयांपर्यंत आणि दीर्घ कर्ज योजना २ लाख रुपयांपर्यंत दिली जाईल. यामध्ये लाभार्थ्याचा ५ टक्के वाटा, ४५ टक्के शासकीय अनुदान आणि उर्वरित ५० टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमामुळे तृतीयपंथीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून स्वावलंबी जीवन जगण्यास मोठी मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

Comments are closed.