भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (SEBI) ने तरुणांसाठी आकर्षक करिअर संधी जाहीर केली आहे. SEBI Young Professional Program 2026 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून अधिकृत संकेतस्थळ www.sebi.gov.in वर सुरू झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹70,000 स्टायपेंड दिले जाणार असून, एक वर्ष कालावधीचा हा कार्यक्रम कामगिरीच्या आधारे आणखी एका वर्षासाठी वाढवता येणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश तरुणांना भारतीय भांडवली बाजाराची (Indian Capital Market) सखोल माहिती देणे आणि SEBI च्या विविध प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे उमेदवारांचा व्यावसायिक अनुभव वाढण्यासोबत भविष्यातील करिअरसाठीही भक्कम पाया तयार होणार आहे.
एकूण ९१ पदांसाठी भरती होणार असून त्यात सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्स (४०), लॉ (१३), रिसर्च (४), इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (२९) आणि राजभाषा (५) या विभागांचा समावेश आहे. पात्रतेनुसार संबंधित क्षेत्रातील पदवी/पदव्युत्तर शिक्षणासोबत किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. काही पदांसाठी सीए, सीएस, सीएमए, पीएचडी किंवा अभियांत्रिकी/आयटी पात्रताही ग्राह्य धरली जाणार आहे.
उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, प्राथमिक मुलाखत आणि अंतिम मुलाखतीच्या आधारे पार पडेल. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील ‘Career’ विभागात जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२६ आहे.
उत्कृष्ट वेतन, प्रतिष्ठित संस्थेसोबत काम करण्याची संधी आणि भांडवली बाजारातील प्रत्यक्ष अनुभव—या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळवण्याची ही सुवर्णसंधी असल्याने इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.