ठाणे शहरातील शिक्षण विभागासमोर एक गंभीर चित्र उभं राहिलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण ७२ शाळांपैकी तब्बल २९ शाळांमध्ये कायमस्वरूपी मुख्याध्यापक नाहीत. यामध्ये ६ मराठी, ५ हिंदी आणि १८ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.

टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) अनिवार्य झाल्यानंतर मुख्याध्यापकपदांसाठी पदोन्नती प्रक्रिया थांबली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता १ ली ते ८ वी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे अनुभवी शिक्षकांची पदोन्नती अडकली असून अनेक शाळा ‘मुख्याध्यापकांविना’ चालवल्या जात आहेत.
मुख्याध्यापक नसल्याने शैक्षणिक नियोजन, विद्यार्थी उपक्रम, तसेच पालक-शिक्षक संवाद यावर थेट परिणाम होत आहे. अनेक शाळांमध्ये वरिष्ठ शिक्षकांना दुहेरी जबाबदारी घ्यावी लागत आहे — शिकवणे आणि प्रशासकीय कामकाज सांभाळणे दोन्ही. त्यामुळे शाळेच्या मूलभूत शैक्षणिक कामावर परिणाम होतो आहे.
अनेक शाळांचे मुख्याध्यापक काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले, परंतु नवीन नियुक्ती झालेली नाही. पदोन्नती प्रक्रिया सात-आठ वर्षांपासून रखडलेली असल्याने आणि बिंदूनामावली पूर्ण न झाल्याने या जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत.
शिक्षक सांगतात की प्रभारी मुख्याध्यापक असले तरी ते तात्पुरते असल्याने निर्णय प्रक्रियेत त्यांना फारसे अधिकार नसतात. परिणामी, शाळेच्या विकासासाठी आवश्यक निर्णय किंवा उपक्रमांना दिशा मिळत नाही.
शिक्षक आणि पालक दोघेही आता प्रशासनाकडे कायमस्वरूपी मुख्याध्यापक नेमणुकीसाठी मागणी करत आहेत, जेणेकरून शाळेचं शैक्षणिक आणि प्रशासकीय नेतृत्व स्थिर होईल.

Comments are closed.