महाराष्ट्र शिक्षण संचालनालयाने ५ डिसेंबर २०२५ रोजी पुकारण्यात आलेले शाळा बंद आंदोलन थेट थांबवत सर्व शाळा नियमित सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याध्यापक महामंडळाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जाहीर केलेल्या या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शाळा बंद ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई होणार असून यात एका दिवसाच्या वेतन कपातीचा समावेश असेल, अशी ठाम भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. हा आदेश राज्यातील सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.

मुख्याध्यापक महामंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारला होता. पुण्यात झालेल्या बैठकीनंतर सर्व शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्याची तयारीही करण्यात आली होती. परंतु शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून हे आंदोलन थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर, शिक्षक संघटनांची पुढील भूमिका काय असेल हे ५ डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
शिक्षण संचालनालयाने सांगितले की या आंदोलनाची माहिती त्यांना वृत्तपत्रातील बातम्या, खाजगी शिक्षण संस्था कृती समितीची निवेदनं, दत्तात्रय सावंत यांचे पत्र आणि शिक्षण संस्था महामंडळाच्या निवेदनातून मिळाली. हे आंदोलन सरकारी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित केले होते. राज्यातील सर्वच स्तरांवरील कर्मचारी यात सहभागी होणार होते.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेण्याचे आवाहन करताना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्टपणे सांगितले की कोणतीही शाळा बंद ठेवू नये. जर शाळा बंद आढळली, तर संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
या पार्श्वभूमीवर विभागीय सहसंचालक, जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की ५ डिसेंबर रोजी राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची खात्री करावी. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करून एका दिवसाचे वेतन कपात करण्याचाही निर्देश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे हित सर्वात महत्त्वाचे असल्याचे शिक्षण विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Comments are closed.